नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोग व देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतदान चोरीचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असून त्यासंदर्भातले काही पुरावेदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. गांधींच्या या आरोपानंतर आता २०२४ ला झालेल्या नागपूर लोकसभा निवडणुकीदरम्यान हजारो लोकांनी मतदार यादींमधून त्यांची नावे गहाळ झाल्याचा आरोप केला होता. यावेळी लोकसत्ताने मतदारांची नावे गहाळ झाली असून त्यांनी प्रशासनावर दोष दिल्याचा आरोप केला होता. तसेच यावेळी भाजपविरोधी भूमिका मांडणाऱ्यांचे नाव गहाळ झाल्याचाही आरोप होता. काय आहे तेव्हाचे प्रकरण बघा. नागपूर लोकसभा मतदारसंघात अनेक मतदान केंद्रावर मतदार यादीतून अनेक मतदारांची नावे गहाळ असल्याचे दिसून आले होते. मतदारांनी वेगवेगळ्या पक्षाकडील यादी तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील यादीत नावे शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच वेगवेगळ्या मतदान केंद्रावरही जावून चौकशी केली, पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले होते. मतदार ओळखपत्र आहे, पण मतदार यादीत नाव नाही अशी होती. त्यामुळे शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांच्या तक्रारी होत्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्रातील “एमटी” मालिकेतील अनेक मतदारांची नावे गहाळ झाल्याच्या तक्रारी आहेत. १९९४ ला ज्यांनी मतदार नोंदणी केली त्यांना मिळालेल्या ओळख पत्राचा क्रमांक “एमटी” पासून सुरू होतो. उदा. MT/123/786/59837 अशी बरीच नावे मतदार यादीत नव्हती. काही मतदारांची नावे पाच किलोमीटर अंतरावरील केंद्रावर होती. सोनेगाव येथे राहणाऱ्या मतदारांची नावे गोरेवाडा केंद्रावर होती. सोनेगाव येथील कर्णबधीर शाळेतील मतदान केंद्र क्रमांक २७६ येथे दुपारी एक वाजेपर्यंत २२ मतदारांनी नाव गहाळ असल्याची तक्रार केली होती. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या मतदारांना यावेळी मात्र मतदान करता आले नाही. नागपुरातील मोमीनपुरा येथील एका मतदान केंद्रावर एकाच कुटुंबातील सात नावे यादीतून गहाळ झाल्याची तक्रार आहे. या कुटुंबातील केवळ एका युवकाचे नाव यादीत होते. उर्वरित मतदारांची नावे गेली कोठे? असा सवाल मतदारांनी त्यावेळी केला होता. नागपूर लोकसभा मतदार संघात काही भागांमध्ये मतदारांची नावे याद्यांमधून गहाळ असल्याचा आरोप झाला होता. अनेक मतदारांची नावेच नसल्याने लोकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. विशेष म्हणजे, यामध्ये साम्यवादी विचारधारेचे आणि समाज माध्यमांवर भाजपविरोधी भूमिका मांडण्यात सक्रिय असणाऱ्यांच्या नावांचा समावेश असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती.
